Coriander farming management : कोथिंबीर लागवड संपूर्ण माहिती

कोथिंबीर हे एक असे पीक आहे जे प्रत्येक घरात दररोज वापरले जाते. घरातील कोणतीही भाजी असो त्यात कोथिंबीर शिवाय त्याची चव अपूर्णच वाटते. त्यामुळे बाजारात कोथिंबीर ला वर्षभर मोठी मागणी असते. विशेष म्हणजे शेतकऱ्यांनी कोथिंबीर या पिकाचे योग्य व्यवस्थापन केल्यास कमीत कमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त नफा मिळवून देणारे पीक आहे.

आजच्या या लेखात आपण कोथिंबीर या पिकाची योग्य लागवड, योग्य बियाणे, पाण्याची व खताचे योग्य व्यवस्थापन कसे करावे व कमीत कमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त नफा कसा मिळवता येऊ शकतो. याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

● कोथिंबीर पिकासाठी पोषक हवामान

कोथिंबीर या पिकासाठी पोषक हवामान असल्यास या पिकाची वाढ जलद होते आणि हिरवीगार पाने मिळतात. त्यामुळे कोथिंबीर या पिकासाठी पोषक हवामान असणे खूप महत्त्वाचे आहे. कोथिंबीर हे विविध हवामान वाढणारे पीक असले तरी थंड आणि सौम्य हवामान वाढीसाठी अधिक फायदेशीर ठरते. महाराष्ट्रातील बहुतांश भागात वर्षभर कोथिंबीर लागवड शक्य आहे. अतिवृष्टी होणाऱ्या भागात लागवड टाळावी. उन्हाळ्यात तापमान 35°c पेक्षा जास्त असल्यास या पिकाची वाढ मंदावते मध्यम तापमानात पाने अधिक हिरवीगार व दाट येतात. खरीप हंगामात या पिकाचे सर्वाधिक उत्पादन होते तर उन्हाळी हंगामात उत्पादन तुलनेने कमी असले तरी बाजारात मागणी जास्त असल्यामुळे शेतकऱ्यांना चांगला दर मिळण्याची शक्यता असते.

● कोथिंबीर पिकासाठी योग्य जमीन :

या पिकाचे चांगले उत्पादन मिळवण्यासाठी योग्य जमीन निवडणे अत्यंत महत्त्वाचे असते. जमिनीची सुपीकता निचरा आणि सेंद्रिय घटक यावर कोथिंबीर वाढीचा मोठा परिणाम होतो. त्यामुळे भुसभुशीत आणि चांगला निचरा होणारी जमीन आधिक फायदेशीर ठरते.

● या पिकासाठी मध्यम कसदार आणि मध्यम खोलीची जमीन सर्वात योग्य मानली जाते

● हलकी ते मध्यम काळी जमीन कोथिंबीर पिकासाठी उत्तम असते.

● मुरमाटी जमीन असल्यास सतत पाणी द्यावे लागते.

● भुसभुशीत जमीन असल्यास मुळांची वाढ चांगली होते.

● गाळाची जमीन देखील उत्पादनासाठी चांगली ठरते.

● योग्य बियाण्यांची निवड :

कोथिंबीर पिकामध्ये चांगले उत्पादन मिळवण्यासाठी उत्तम दर्जाची बियाणे निवडणे अत्यंत महत्त्वाचे असते सामान्यतः कोथिंबीर चे वाण दोन प्रकारात विभागले जातात. पहिला गावठी वाण आणि दुसरा संकरित (Hybrid) वाण. वाणानुसार पिकाची वाढ उत्पादन आणि पानांची गुणवत्ता बदलू शकते.

गावठी कोथिंबीर ला चांगला सुगंध आणि स्वाद असतो. त्यामुळे घरगुती वापर आणि स्थानिक बाजारासाठी योग्य मानली जाते. उत्पादन तुलनेने मध्यम मिळते. या वाणाची खरीप व रब्बी हंगामात एकरी 18 ते 20 किलो याप्रमाणे तर उन्हाळी हंगामात एकरी 25 ते 30 किलो याप्रमाणे लागवड केली जाते.

संकरित (Hybrid) वाण हे संशोधनाद्वारे विकसित केलेले असतात. या वाणामध्ये उत्पादन क्षमता अधिक असते. अनेक व्यावसायिक शेतकरी जास्त नफा मिळवण्यासाठी संकरित (Hybrid) वाणांची लागवड करत असतात. या वाणाची खरीप व रब्बी हंगामात एकरी 7 ते 9 किलो याप्रमाणे तर उन्हाळी हंगामात एकरी 10 ते 12 किलो याप्रमाणे लागवड केली जाते.

● लागवड पद्धत :

कोथिंबीर या पिकाची लागवड प्रामुख्याने तीन पद्धतीने केली जाते. जमिनीचा प्रकार पाण्याची उपलब्धता आणि शेतकऱ्यांच्या सोयीप्रमाणे लागवड पद्धत निवडली जाते.

(1) फोकुन :

या पद्धतीमध्ये बियाणे समान प्रमाणात फोकले जाते. ही पद्धत सोपी आणि जलद आहे. मोठ्या क्षेत्रात लागवड करण्यासाठी उपयोगी. पेरणीनंतर हलकी कोळपणी करून बियाणे माती खाली झाकली जाते.

(2) पेरणी :

या पद्धतीमध्ये यंत्राच्या साह्याने पेरणी करून वाफे तयार केली जातात. ही पद्धत पाण्याचा योग वापर आणि पिकाची चांगली वाढ यासाठी उपलब्ध ठरते.

(3) बेड पद्धत :

या पद्धतीमध्ये शेतात उंच बेड तयार करून त्यावर कोथिंबीरची लागवड केली जाते. त्यामुळे पिकाला चांगला निचरा मिळतो मुळांची चांगली वाढ होते. उत्पादन आणि दर्जा सुधारतो

● खत व्यवस्थापन

कोथिंबीर पिकाच्या उत्तम वाढीसाठी लागवडीपूर्वी 6 ते 7 टन कुजलेले शेणखत कंपोस्ट खत जमीन मिसळावे. यामुळे जमिनीची सुपीकता वाढते. आणि माती भुसभुशीत राहण्यात मदत होते.

कोथिंबीर लागवडीपूर्वी खालील प्रमाणे खतांचा प्रति एकरी याप्रमाणे वापर करावे

● 10:26:26 – 2 बॅग

● MOP (म्युरेट ऑफ पोटॅश) – 50 Kg

● NPK – 4 Kg

● Pancham Gold – 25 kg

लागवडीनंतर हलके पाणी दिल्यास खतांचा चांगला परिणाम दिसून येतो

● कीड व रोग नियंत्रण

कोथिंबीर पिकामध्ये सुरुवातीच्या अवस्थेत रस शोषक कीड, बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव, मर, करपा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे पेरणीनंतर योग्य ती फवारणी करणे आवश्यक असते. फवारणीपूर्वी जमिनीत ओलावा असणे गरजेचे आहे.

फवारणीचे प्रमाण प्रतिएकरी 200 लिटर पाण्यात.

पहिली फवारणी 10 ते 15 दिवसांनंतर

● BAVISTIN – 200 ग्रॅम

● ACTARA – 100 ग्रॅम

● Dr. Ortho SIL – 250 ml

● COMBI – 100 ग्रॅम

दुसरी फवारणी 20 ते 25 दिवसांनंतर

प्रतिएकरी 200 लिटर पाण्यासाठी

● Merivon – 80 ml

● Solomon – 250 ml

● Crop Tonic 21-50 ml

तिसरी फवारणी 30 ते 32 दिवसांनंतर

प्रतिएकरी 200 लिटर पाण्यासाठी

● Score – 100 ml

● Alika – 100 ml

● Dr. Grow – 300 ml

● 00:52:34 – 500 ग्रॅम

कोथिंबीर या पिकासाठी योग्य हवामान सुपीक जमीन सुधारित बियाणे आणि खत व्यवस्थापन केल्यास कोथिंबीरची वाढ जोमदार होते तसेच योग्य वेळी फवारणी व पाणी व्यवस्थापन केल्यास कीड व रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो योग्य पद्धतीने लागवड केल्यास हे पीक साधारण 35 ते 40 दिवसात काढण्यासाठी तयार होते त्यामुळे शेतकऱ्यांना कमी कालावधीत चांगले उत्पादन आणि आर्थिक फायदा मिळू शकतो आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा वापर करून कोथिंबीर लागवड केल्यास हे पीक शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाची चांगले साधन ठरू शकते.

Leave a Comment